वसंतसागर वृत्तसेवा कराड :
साहित्य, संस्कृती व विचारविनिमयाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जपण्याचे कार्य सातत्याने करणाऱ्या शब्दवेध संस्थाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. २३ रोजी महिला महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात “जगणे आनंदाचे” या विषयावर ज्येष्ठ वक्ते ॲड. चिंगळे यांचे अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या कार्याचा मागोवा घेताना मा.राजाभाऊ लाटकर यांनी शब्दवेध संस्थेच्या स्थापने पासून आजपर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. “शब्दवेधमध्ये कोणी अध्यक्ष वा पदाधिकारी नसून सर्वजण कार्यकर्ते म्हणून समान भूमिकेत कार्य करतात. साहित्याचा निखळ आनंद घेणे आणि तो समाजापर्यंत पोहोचवणे हेच संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
संस्थापक सदस्य अरुण काकडे यांच्या हस्ते वक्ते ॲड. सदानंद चिंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य व कर्मचारी वर्गाने केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. देशपांडे यांनी केले.
“जगणे आनंदाचे” या विषयावर बोलताना ॲड.चिंगळे यांनी जीवन प्रवासातील आनंदाचा अर्थ विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला. जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात नसले, तरी त्या मधील आयुष्य कसे जगायचे, हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, असे त्यांनी नमूद केले. सकारात्मक विचार, वाचनसंस्कृती, मानवी नाती, कला, संगीत व निसर्ग यांच्या सहवासातून जीवनात समाधान व आनंद प्राप्त होतो, असे त्यांनी सांगितले.पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद हा व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून वाचन संस्कृती टिकविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवनातील दुःखांवर लक्ष केंद्रित न करता छोट्या-छोट्या आनंदाच्या क्षणांचा स्वीकार केल्यास जगणे अधिक अर्थपूर्ण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शब्दवेध संस्थेचे कार्य हे केवळ वाचना पुरते मर्यादित नसून विचारमंथन, चर्चा आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याचे कार्यही ते प्रभावीपणे करीत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शब्दवेध परिवारातील सदस्य, साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्धापन दिन सोहळ्यामुळे उपस्थितांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.