वसंतसागर वृत्तसेवा वारणावती 


सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गुरुवारी सकाळी निसर्गाने पुन्हा एकदा आश्वासक संकेत दिला. प्रौढ व्याघ्रिणी एस. टी. आर.–०५ ‘तारा’ हिने चंदोलीच्या घनदाट कोअर जंगलात यशस्वीपणे मुक्तसंचार सुरू करत सह्याद्रीच्या व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना नवी दिशा दिली.


शास्त्रीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या सॉफ्ट रिलीज प्रक्रियेची सर्व टप्प्यांत यशस्वी पूर्तता झाल्यानंतर सकाळी सात वाजता तारा हिने जंगलात स्वतंत्रपणे वावरण्यास सुरुवात केली. १३ डिसेंबर रोजी पिंजऱ्याचे दरवाजे खुले करण्यात आले असले तरी काही दिवस तिने परिसरातच मुक्काम ठेवत नैसर्गिक वर्तन दाखवले. या काळात तिने स्वतः शिकार करून सलग तीन दिवस अन्नग्रहण केले. यामुळे तिची शिकारी क्षमता, तंदुरुस्ती आणि जंगलात स्वतंत्र जीवन जगण्याची तयारी पूर्ण असल्याचे स्पष्ट झाले.


पूर्वी T7 (S2) या ओळखीने व्यवस्थापनाखाली असलेली ही व्याघ्रिणी सॉफ्ट रिलीज कालावधीत वनाधिकारी व वन्यजीव तज्ज्ञांच्या सततच्या निरीक्षणाखाली होती. तिच्या हालचाली, आरोग्यस्थिती, वर्तन व अधिवासाशी जुळवून घेण्याची क्षमता यांचे शास्त्रीय मूल्यांकन करण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीत ती पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले.


क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “ताराने दाखवलेले नैसर्गिक वर्तन अत्यंत समाधानकारक आहे. ही मुक्तता सह्याद्री परिसरात स्थिर व टिकाऊ व्याघ्र लोकसंख्या निर्माण करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.”


मुख्य वन्यजीव संरक्षक एम. एस. रेड्डी यांनीही ही प्रक्रिया ठरावीक प्रोटोकॉल व वैज्ञानिक निकषांनुसार राबविल्याचे स्पष्ट करत, महाराष्ट्र वन विभागाच्या दीर्घकालीन संवर्धन धोरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले.


सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात STR-04 आणि STR-05 (तारा) अशा दोन प्रौढ वाघिणी मुक्तपणे संचार करत आहेत. त्यामुळे येत्या काळात व्याघ्र वंशवृद्धीची शक्यता वाढली असून, परिसरातील जैवविविधतेला बळ मिळणार आहे. त्याचबरोबर शाश्वत वन पर्यटनाला चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला आहे.


मुक्ततेनंतरही ताराचे नियमित निरीक्षण सुरू राहणार असून, ती नैसर्गिक अधिवासाशी सुसंगतपणे जुळवून घेत आहे यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमात भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ, वनाधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व मानद वन्यजीव रक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.


सह्याद्रीच्या जंगलात पुन्हा उमटलेली वाघिणीची पावले ही संवर्धनाच्या दिशेने आशेची नवी चाहूल ठरत आहेत.