वसंतसागर वृत्तसेवा वारणावाती 

चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच्या शिराळे–वारुण परिसरातील पार्टेवाडी (ता. शाहूवाडी) येथे रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पार्टेवाडी येथील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर (वय ४५) हे सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात गेले असता, झुडपाआड दबा धरून बसलेल्या रानगव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. जोरदार धडकेमुळे चिंचोलकर खाली कोसळले. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर सुमारे ८ ते १० सेंटीमीटरची गंभीर जखम झाली असून पोटातील आतडी बाहेर येण्याइतकी इजा झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्र, शित्तूर येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी चिंचोलकर यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथे कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात गेल्या काही वर्षांपासून रानगवे व अन्य हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याच गावातील मयूर यादव या तरुणावर वर्षभरापूर्वी रानगव्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.

दरम्यान, घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.