वसंतसागर वृत्तसेवा ईश्वरपूर :

 ईश्वरपूर-बहे मार्गावर रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत बिबट्याने धावत्या दुचाकीवर झडप घालत एका युवकाला जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील राजेंद्र माने हे कामानिमित्त ईश्वरपूर एमआयडीसीमध्ये आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास काम आटोपून ते पुतण्या अथर्व माने (वय २५, रा. मलकापूर, कराड) आणि एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून बहेच्या दिशेने निघाले होते.हुबलवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ पोहोचताच अचानक झुडपातून बिबट्या बाहेर आला आणि त्याने थेट धावत्या दुचाकीवर झडप घातली. या अचानक झालेल्या हल्ल्यात अथर्व माने यांच्या डाव्या पायाच्या घोट्याला बिबट्याच्या नखाने गंभीर जखम झाली. सुदैवाने इतर दोघे थोडक्यात बचावले.हल्ल्यानंतर बिबट्या तात्काळ जंगलाच्या दिशेने पसार झाला. जखमी अथर्व यांना प्रथम ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे