वसंतसागर वृत्तसेवा, सांगली :
आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी देशभरात मतदारसंघांची पुनर्रचना होण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिकरीत्या याला दुजोरा देत, “जिल्ह्यात दोन पूर्ण लोकसभा मतदारसंघ निर्माण होतील आणि एक विधानसभा मतदारसंघ वाढेल,” असे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, खासदार विशाल पाटील यांनीही संसदेत नव्या रचनेचा मुद्दा उपस्थित केल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर ईश्वरपूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भौगोलिक सलगतेचा विचार करता शिराळा, पलूस-कडेगाव तसेच खानापूर-आटपाडी हे विधानसभा मतदारसंघ या नव्या मतदारसंघात समाविष्ट होऊ शकतात. तर सध्याच्या सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत हे भाग कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन संसद भवन उभारताना ८८८ सदस्यांसाठी आसनव्यवस्था तयार करण्यात आली असून, भविष्यात लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्याचा केंद्राचा स्पष्ट कल आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर साधारण १० लाख मतदारांमागे एक लोकसभा मतदारसंघ असा निकष गृहित धरला जात असल्याने सांगली जिल्ह्यात दोन स्वतंत्र मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे, तर उर्वरित दोन मतदारसंघ हातकणंगले लोकसभा क्षेत्रात येतात. नव्या रचनेत सहा तालुक्यांचा एक आणि चार तालुक्यांचा दुसरा असा दोन मतदारसंघांचा फॉर्म्युला लागू होऊ शकतो. मात्र, यासाठी नेमके निकष काय असतील, भौगोलिक संतुलन कसे साधले जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, २०२९ च्या लोकसभा तसेच पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते आपल्या कुटुंबातील महिलांना मतदारसंघात सक्रिय करण्यावर भर देत असून, महिला मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे चित्र आहे.
विधानसभा रचनेत संभाव्य बदल :
शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश असून, त्यातील काही गावे ईश्वरपूरकडे वळवली जाऊ शकतात. मिरज तालुक्यातील काही गावे सांगलीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. तासगाव तालुक्यातील काही भाग खानापूरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. तसेच कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भाग मिळून स्वतंत्र मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरी भागांवर आधारित दोन स्वतंत्र मतदारसंघ तयार होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
संभाव्य मतदारसंख्या रचना :
सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज (३,४३,८७६), सांगली (३,५६,४१०), तासगाव-कवठेमहांकाळ (३,१२,८८६) आणि जत (२,९१,३६३) मिळून एकूण सुमारे १२.३१ लाख मतदार राहू शकतात.
तर ईश्वरपूर लोकसभा मतदारसंघात ईश्वरपूर (२,८०,८५६), शिराळा (३,०७,०१२), पलूस-कडेगाव (२,९२,८६६) आणि खानापूर (३,५०,९९६) मिळून सुमारे १३.०५ लाख मतदारसंख्या असण्याचा अंदाज आहे.
एकूणच, नव्या मतदारसंघ रचनेमुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.