वसंतसागर वृत्तसेवा मुंबई :


    महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Maharashtra Chamber of Commerce, Industry & Agriculture (मॅक्शिया) यांच्या फार्मा, हेल्थ केअर अँड वेलनेस कमिटीच्या अध्यक्षपदी मुंबईचे मंगेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅक्शियाचे अध्यक्ष रविंद्र मंगावे यांनी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र नुकतेच दिले.

मॅक्शिया ही महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्राचे सर्वोच्च प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, सन २०२७ मध्ये संस्थेला स्थापनेची १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक व आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

फार्मा, हेल्थ केअर व वेलनेस समिती औषधनिर्मिती उद्योग, आरोग्यसेवा तसेच वेलनेस क्षेत्रातील समस्या, संधी व आव्हानांवर काम करते. या समितीच्या माध्यमातून उद्योगातील अडचणी सोडवणे, नव्या संशोधन व नवकल्पनांना चालना देणे, तसेच आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मंगेश चिवटे यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा समितीच्या कामकाजाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास मॅक्शियातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फार्मा, हेल्थ केअर व वेलनेस क्षेत्रातील उद्योग आणि शासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावीपणे साधला जाईल, अशी अपेक्षाही संस्थेने व्यक्त केली आहे

MACCIA चे पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य,समिती सदस्य,उद्योग प्रतिनिधी, आरोग्य तज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांच्या सहकार्याने समितीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आणि भरीव कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.मंगेश चिवटे हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मूळ संकल्पक व कक्ष प्रमुख म्हणूनही कार्यरत असून, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत MACCIA कडून त्यांची ही नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे

या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील औषधनिर्मिती उद्योग, आरोग्यसेवा आणि वेलनेस क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळणार असून, विविध विकासात्मक उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे