वसंतसागर वृत्तसेवा कराड :
सातारा जिल्ह्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीत सोमवारी सकाळी एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की सुमारे १० किलोमीटर पर्यंत परिसर हादरल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी इमारतींच्या काचा फुटल्याची नोंद आहे.
प्राथमिक माहिती नुसार, संबंधित कंपनीत केमिकल प्रक्रिये दरम्यान अचानक आग लागली आणि काही क्षणातच केमिकलने भरलेल्या बॅरल्सचे स्फोट होऊ लागले. स्फोटांचा आवाज दूरवर ऐकू गेला. घटनेच्या वेळी परिसरात मोठी धावपळ उडाली असून अनेक नागरिक घराबाहेर पडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विविध ठिकाणांहून अग्निशमन बंब मागवण्यात आले होते. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती असली तरी काही जखमी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, जखमींचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा आणि तयार माल जळून खाक झाला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरात केमिकलचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, या दुर्घटने मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
विशेष म्हणजे, याच औद्योगिक परिसरातील सुरक्षे बाबत यापूर्वीही इशारे देण्यात आले होते. अग्निशमन सुविधा बळकट करण्याबाबत तसेच उद्योगांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले का, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.