वसंतसागर वृत्तसेवा शिराळा :
शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द येथील सरपंच आणि त्यांच्या शिक्षक पतीला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सार्वजनिक कामासाठी ‘ताबा पावती’ देण्यासाठी आणि शासकीय कपाती जमा करण्याच्या बहाण्याने ही लाच मागण्यात आली होती.
सरपंच शितल बाळासाहेब पाटील (वय ४३) आणि त्यांचे पती बाळासाहेब आकाराम पाटील (वय ५३, प्राथमिक शिक्षक) अशी आरोपींची नावे असून, दोघांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला अनुसूचित जाती-जमाती नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम मंजूर झाले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पुढील हप्ता मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘ताबा पावती’ आवश्यक होती. ही पावती देण्यासाठी तसेच विमा, आयकर, जीएसटी आदी कपाती शासनाकडे जमा करण्याच्या कारणावरून आरोपींनी मंजूर अनुदानाच्या सुमारे ७ टक्के रकमेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत ६ एप्रिल रोजी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत आरोपींनी सुरुवातीला ५० हजारांची मागणी केली होती, मात्र नंतर ३५ हजारांवर सौदा ठरल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर शिराळा तहसील कार्यालयासमोरील ‘हॉटेल दौलत’ येथे सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताच दोघांनाही एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अर्जुन भोसले आणि उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण व पथकाने केली.
दरम्यान, शिक्षक आणि सरपंच अशा जबाबदारीच्या पदांवर असलेल्या दाम्पत्याकडूनच लाच स्वीकारली गेल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.