वसंतसागर वृत्तसेवा सातारा :
आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरवठा मुबलक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करून साठवणूक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत असून BPCL, HPCL यांसह तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात इंधनाची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही पंपांवर ‘अॅडव्हान्स पेमेंट’ प्रणालीमुळे पुरवठ्यात तात्पुरती अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार केल्यास Essential Commodities Act 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच सुरक्षेच्या कारणास्तव प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधन विक्रीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर कारवाई करून परवाना रद्द करण्याची शिफारसही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले असून बेकायदेशीर साठेबाजी अथवा काळाबाजाराबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही सांगितले