वसंतसागर वृत्तसेवा कराड : 

कराड-मसूर राज्य महामार्गालगत सैदापूर परिसरातील कॅनॉलजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या नाका तोंडाला आलेला मुख्य गटारीचा प्रश्न अखेर सुटला असून शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल दशकभर रखडलेले हे काम अवघ्या पंधरा दिवसांत पूर्ण करून नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. माधवीताई नानासाहेब पाटसुपे यांनी नागरिकांच्या अपेक्षांना न्याय दिला आहे.

या परिसरातील मुख्य गटार दीर्घकाळ अपूर्ण अवस्थेत असल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत होते. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले होते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होत होती. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.

वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र, नुकत्याच निवडून आलेल्या सौ. पाटसुपे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतला. संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष कृतीत काम करणे भाग पाडले .

सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य कुमार देसाई, नानासाहेब पाटसुपे, संग्राम सकट, बांधकाम विभागाचे उपअभियंता टोपे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून गटारीतील अडथळे दूर करण्यात आले. प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक कामे वेगाने पूर्ण करण्यात आली.

या कामामुळे परिसरातील वातावरणात लक्षणीय बदल जाणवू लागला असून दुर्गंधीपासून मुक्ती मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. डासांचे प्रमाण कमी होऊन संसर्गजन्य आजारांचा धोका घटेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अल्पावधीत सोडविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पंचायत समिती सदस्या सौ. माधवीताई नानासाहेब पाटसुपे व सरपंच फत्तेसिंह जाधव व 

संबंधित पदाधिकारी आणि प्रशासनाचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशाच तत्परतेने मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.