वसंतसागर वृत्तसेवा

माण तालुक्यातील गावोगावी पक्ष संघटन मजबूत करून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला लागावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी केले. माण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीच्या सुरुवातीस तालुक्यातील पक्षाच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. यापूर्वी झालेल्या कुरघोडीच्या राजकारणाबाबत कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी, यापुढे ग्रासरूट पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल तसेच त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आश्वासन दिले.

ते पुढे म्हणाले की, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप वगळता समविचारी पक्षांशी युती करण्यास कोणतीही हरकत नाही.

ही आढावा बैठक तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा महासचिव सुनील कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, माजी सभापती व सल्लागार बाळासाहेब रणपिसे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सुनील भोसले, संतोष भोसले, आबा भोसले, शरद शिंदे, रेश्मा शिलवंत, माधुरी भोसले, पत्रकार महेंद्र भोसले, राजू आवटे, अशोक पवार, गणेश कांबळे, आबा बनसोडे, मिलिंद भोसले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते