वसंतसागर वृत्तसेवा  उंडाळे : 

कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे या विभागातील नागरिकांना जवळच्या ठिकाणी आणि कमी खर्चात न्याय मिळू लागला आहे. खटल्यांचा निकाल वेगाने लागत असल्याने जनतेचा वेळ व पैसा वाचत आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले.

उंडाळे येथे स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर सामाजिक पुरस्कार भूषण गवई यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

भूषण गवई म्हणाले की, निवृत्तीनंतर अनेक संस्थांकडून पुरस्कार स्वीकारण्याचे प्रस्ताव आले; मात्र उंडाळे ही स्वातंत्र्यसैनिकांची आणि हुतात्म्यांची भूमी असल्याने येथील पुरस्कार स्वीकारणे हे आपल्यासाठी सन्मानाचे आणि जबाबदारीचे वाटले. स्वातंत्र्यामुळेच मला सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.

न्यायालयीन कामकाजाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणतेही सरकार असो, न्यायनिर्णय हे कायदा व न्यायभावनेवर आधारित असले पाहिजेत. वनविभागाची जमीन बळकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात निर्णय देऊन ती जमीन पुन्हा वनविभागाकडे देण्यात आली. तसेच विदर्भातील धुपी जंगल प्रकरणासह अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात यश आले, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर सर्किट बेंच हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगताना ते म्हणाले, “मी न्यायमूर्ती असताना अनेकदा कोल्हापूरला येण्याची निमंत्रणे आली होती; मात्र सर्किट बेंच सुरू झाल्याशिवाय कोल्हापूरला यायचे नाही, असा निर्धार केला होता. आज त्या निर्धाराची पूर्तता झाल्याचे समाधान आहे. या बेंचमुळे सर्वसामान्यांना तातडीने न्याय मिळत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.”

कार्यक्रमात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, तसेच स्मारक समितीचे विश्वस्त ॲड. विजय पाटील उपस्थित होते.

सन्मानपत्राचे वाचन प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. प्रास्ताविक ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय ॲड. विजय पाटील यांनी करून दिला. आभार प्रा. धनाजी काटकर यांनी मानले.