आनंदा सुतार
वसंतसागर वृत्तसेवा कराड
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन यांच्यात आज कराड येथे सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा मुख्य उद्देश सह्याद्री परिसरात समुदायाधारित संवर्धन उपक्रमांना चालना देणे तसेच मानव–वन्यजीव सहअस्तित्व अधिक प्रभावी करणे हा आहे.हा करार सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक श्री. तुषार चव्हाण (भा.व.से.) आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनच्या संचालिका सौ. विद्या वेंकटेश यांच्या उपस्थितीत करण्यात आला.उत्तर पश्चिम घाटात वसलेले सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र हे जागतिक दर्जाच्या पश्चिम घाट जैवविविधता हॉटस्पॉटचा भाग असून त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना व राधानगरी वन्यजीव अभयारण्यांचा समावेश आहे. या भागात वाघ, बिबट्या, गौर, अस्वल, सांबर, रानकुत्रा तसेच अनेक दुर्मिळ व स्थानिक प्रजाती आढळतात.
या करारानुसार बफर आणि सीमेवरील गावांमध्ये लोकसहभाग वाढवणे, संवर्धन विषयक जनजागृती करणे, स्थानिकांची क्षमता वाढवणे, मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करणे आणि गावपातळीवर संरक्षण यंत्रणा सक्षम करणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन ही कंपनी कायदा २०१३ अंतर्गत (कलम ८) नोंदणीकृत संस्था असून ती वन्यजीव संवर्धन, समुदाय सहभाग व संवर्धन शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. यापूर्वी संस्थेने पेंच व्याघ्र प्रकल्प आणि कान्हा व्याघ्र प्रकल्प येथे वनविभागाच्या सहकार्याने समुदाय सहभाग व इको-डेव्हलपमेंट उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.यावेळी बोलताना क्षेत्र संचालक तुषार चव्हाण म्हणाले,
“सह्याद्रीसारख्या संवेदनशील व विस्तीर्ण भूप्रदेशात दीर्घकालीन संवर्धनासाठी स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. या सामंजस्य करारामुळे सहअस्तित्वाची संकल्पना अधिक मजबूत होईल आणि गावपातळीवर संवर्धनाला बळ मिळेल.”
तर सौ. विद्या वेंकटेश म्हणाल्या,
“स्थानिक समुदाय संवर्धन प्रक्रियेत सहभागी झाले की त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रासोबत काम करताना पश्चिम घाटात समुदायाधारित संवर्धनाचे प्रभावी मॉडेल उभे करण्याची संधी आम्हाला मिळेल.”या कराराअंतर्गत लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनकडून विविध समुदायाधारित संवर्धन व मानव–वन्यजीव सहअस्तित्व कार्यक्रम राबविले जातील. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या, समन्वय व क्षेत्रीय मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व उपक्रम एनटीसीए मार्गदर्शक तत्त्वे व महाराष्ट्र वन विभागाच्या नियमांनुसार राबविण्यात येतील.या वेळी उपसंचालक किरण जगताप, उपसंचालक स्नेहलता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे तसेच लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनचे केदार भिडे आदी उपस्थित होते.हा सामंजस्य करार १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.